पंडूरोग (सिकलसेलची)
सिकलसेलची लक्षणे ओळखा
डॉ. अनिरुद्ध गुर्जलवार
बालरोगतज्ज्ञ
लाल रक्तपेशींत झालेल्या बदलामुळे बालकाला शरीरातील वेगवेगळ्या भागांत उत्पन्न होणाऱ्या जीवघेण्या वेदनांना सामोरे जावे लागते; शिवाय हिमोग्लोबिन कमी झाल्याने पंडूरोग (अॅनिमिया) निर्माण होतो. शरीराची वाढ खुंटते. अशा बालकांना संक्रमक रोग (इन्फेक्शन) लवकर होतात. जास्त तीव्रतेचे होतात. नवजात शिशूमध्ये एक वेगळे हिमोग्लोबिन असते. त्याला एचबीएफ म्हणतात. हे तीन-चार महिन्यांनी बदलते व होते एचबीए (ए म्हणजे अॅडल्ट). सिकल रुग्णांमध्ये ते होते, एचबीएस (एस म्हणजे सिकल). एचबीएफ हे सिकल हिमोग्लोबिनमुळे होणारा त्रास कमी करते.
साधारण बाळ सहा महिन्यांचे झाले, की त्रास सुरू होतो. बाळ किरकिरे होते. पांढरेफटक दिसू लागते. त्याचे वजन पाहिजे तेवढे वाढत नाही. पोटाच्या तपासणीत त्याच्या यकृताचा आकार वाढलेला असतो व प्लीहासुद्धा वाढलेली असते. ती टणक गोळ्यासारखी लागते. कुटुंबातील आजीच्या ही गोष्ट लवकरच लक्षात येते. त्यामुळे असे बाळ लवकरच डॉक्टरांकडे नेले जाते. अशा वेळी त्याचे रोगनिदान लवकर होऊ शकते. असे न झाल्यास काही काळाने बाळाचे हात व पाय सुजतात (पंजे व पावले फक्त). लाल होतात व दुखतात. हे लक्षण सिकल रोगाचे खास लक्षण आहे. इलाज करून ठीक झाल्यावर पुन्हा हाच त्रास उद्भवू शकतो.
काही मुले एकदम पांढरी पडतात. त्यांचे हिमोग्लोबिन एकदम कमी झालेले असते. काही मुले पिवळी दिसतात. त्याला कावीळ म्हणतात. काही मुलांना एकदम श्वासाचा त्रास सुरू होतो व जोराचा ताप येतो. डॉक्टर म्हणतात 'न्युमोनिया' झाला आहे. रक्त तपासणीत उघड होते, की अपत्याला सिकल रोगदेखील आहे. हे आजारपण वारंवार होते. मुलाची वाढ नीट होत नाही. ते अशक्त होते. कधीकधी मुलाला रक्त द्यावे लागते.
थोडे वय वाढल्यावर प्रचंड प्रमाणात पाठदुखी, हातपाय दुखणे, पोट दुखणे, छाती दुखणे, न्युमोनिया, वारंवार ताप इत्यादी लक्षणे जोर करतात. सोबतीला अॅनिमिया व कावीळ असतेच. अधूनमधून रक्तही घ्यावे लागते. कधी हाडाचे इन्फेक्शन होते, कधी अचानक लकवा होतो. (मेंदूतील रक्तप्रवाहात अडथळा) येतो. क्वचितप्रसंगी यकृत एकदम वाढते व मूल गंभीर होते. या समस्येला 'क्रायसिस' म्हणतात. अशी अवस्था गंभीर असते व त्वरेने इलाज न केल्यास मृत्यू होऊ शकतो. क्वचित रक्त एकदम कमी होते. (एचबी-१ जीएम वगैरे) याला 'अॅपलास्टिक क्रायसिस' म्हणतात.
थोड्या मोठ्या मुलांत म्हणजे सात-आठ वर्षांवरील मुलांत; विशेषकरून किशोरवयीन मुलांत इतर समस्या दिसतात.
पित्ताशयाचे खडे : यात एकदम कावीळ होते व उजवीकडे भयंकर पोट दुखते.
मांडीच्या हाडाची शीर निकामी होणे : अशा मुलांना जांघेत भयंकर वेदना होतात. ते नीट हिंडू-फिरू शकत नाहीत. झोपून राहतात.
शिश्नाचा वेदनादायक ताठरपणा : किशोरवयीन मुलांमध्ये लिंग ताठ झाले, की ते कधी कधी तीन-चार तास ताठ राहते व भयंकर वेदना होतात.
पायाची जखम : ही जखम दीर्घकाळ टिकते. लवकर ठीक होत नाही. त्यामुळे इतर संक्रमक रोग होऊ शकतात.
उशिरा येणारे किशोरवयातील बदल : उदा. पाळी उशिरा येणे, उंची न वाढणे अशाप्रकारे सिकलचा रुग्ण हा सतत वारंवार व दीर्घकाळासाठी आजारपण सहन करतो.
Comments
Post a Comment